Fake Shalarth ID Case Prashant Wadile Arrested
धुळे : राज्यभरात चर्चेत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून संशयित प्रशांत वाडीले याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याच्या गोंदुर रोडवरील वैभव नगर येथील राहत्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर वाडीले याला धुळे न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी नाशिक येथे नेण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवणाऱ्या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्याच अनुषंगाने आठ सदस्यीय पथक सोमवारी धुळ्यात दाखल झाले. पथकाने वाडीले याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि घराची सखोल झडती घेतली. या कारवाईदरम्यान शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित बनावट कागदपत्रांचा शोध घेण्यात आला. मात्र, तपासासाठी महत्त्वाचे मानले जाणारे लॅपटॉप आणि संगणक पथकाच्या हाती लागले नसल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळपासूनच झडती आणि पंचनामा प्रक्रिया सुरू होती. या कारवाईसाठी देवपूर पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाडीले याला पुढील चौकशीसाठी नाशिक येथे हलविण्यात आले.
दरम्यान, प्रशांत वाडीले हे विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
या प्रकरणात धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल ८९४ शिक्षक तसेच तीन उपसंचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय काही संस्थाचालकही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याचे समजते.
तक्रारदार पंकज साळुंखे यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, प्रशांत वाडीले यांच्या नावावर ६५ शाळा नोंदविल्या गेल्या असून त्यापैकी ६२ शाळा अस्तित्वात नसल्याचा दावा आहे. सध्या केवळ शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील दोनच शाळा कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणातील यापूर्वीच्या सर्व चौकशा रद्द करून स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.