Life Imprisonment for Murder Youth in Dhule
धुळे: घर भाडयाने दिले नाही, एवढया क्षुल्लक कारणावरुन राजीव गांधी नगर येथे राहणारा रविंद्र काशिनाथ पगारे (वय २८) याचा भरवस्तीमध्ये त्याच्या आई, मुलगा व पत्नी यांच्यासमक्ष चाकूने भोसकून निघृण खून करणा-या जय उर्फ दादा वाल्मीक मोरे यास धुळे सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात आरोपीस खटल्याचा निकाल लागे पर्यंत जामीन देण्यात आला नव्हता. हा खटला अंडर ट्रायल चालविण्यांत आला आहे.
राजीव गांधी नगर येथील राहणारा सराईत गुन्हेगार याच्यावर मारहाण करणे, दरोडा टाकणे व बलात्काराचे गंभीर खटले असलेला आरोपी जय मोरे यांस राजीव गांधी नगर येथील भटू पगारे याचे घर भाडयाने पाहिजे होते. परंतु, त्यास ते घर भाडयाने न देता ते दुस-याला भाडयाने दिले. त्यामुळे जय मोरे याने त्रास देण्यास सुरुवात केली. त्याला कंटाळून भटू पगारे हा मोराने येथे राहण्यास निघून गेला होता. त्या गोष्टीचा राग धरून दि. २० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास आरोपी जय मोरे हा भटू पगारे याचा भाऊ रविंद्र पगारे याच्या कडे गेला.
त्यावेळी रविंद्र याची पत्नी, लहान बाळ सिध्दु, मोठा मुलगा प्रथमेश हा जवळच उभा होता. त्याचप्रमाणे रविंद्रची आई निलाबाई ही अंगणातच बसलेली होती. त्यावेळी जय याने रविंद्र यास शिवीगाळ केली. विजारीतून चाकू बाहेर काढला. व रविंद्र यांच्या छातीत वार करून तो पळून गेला.
जखमी अवस्थेत रविंद्र यास सिव्हील हॉस्पीटल येथे नेले असता वैद्यकिय अधिकारी यांनी तपासणी करून रविंद्र यास मृत घोषीत केले. मृताची पत्नी कविता रविंद्र पगारे हिने आरोपी जय विरूध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदरच्या गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक संतोष प्रभाकर तिगोटे यांच्या कडे सोपविण्यात आला.
सपोनि तिगोटे यांनी उत्कृष्ट असा तपास करत तात्काळ आरोपीस अटक केले. व सोबतच मयत फिर्यादी आरोपी यांच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे, त्याच प्रमाणे गुन्हयात वापरलेला हत्यार चाकू, जे आरोपीने लपवून ठेवले होते ते जप्त करून न्यायालयात दाखल केले. साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घटनेचा सखोल तपास करत न्यायालयात आरोप पत्र दाखल केले.
सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करताना जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर, यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष व इतर तपासण्यात आलेल्या साक्षीदाराची साक्ष तसेच अभिलेखावर असलेल्या रासायनिक विश्लेषनाचे अहवाल व आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली. तसेच मृत हा महानगरपालिकेच्या घंटागाडीवर कामास होता. त्याच्यावर परिवाराच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. कर्त्या पुरूषाचा खुन झाल्यामुळे सर्व कुटूंब रस्त्यावर आले असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले. त्यामुळे मृताच्या कुटुंबास जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यांच्यामार्फत योग्य तो आर्थिक भरपाईचा आदेश व्हावा, असा प्रखर युक्तीवाद करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी संपूर्ण पुराव्यांचा, युक्तीवादाचा व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकालाचा विचार करुन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपयाचा दंड, तसेच दंड न भरल्यांस ६ महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याच प्रमाणे विधी सेवा प्राधिकरणाला योग्य ती आर्थिक भरपाई देण्याच्या सुचना केल्या.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. मयुर बैसाने, अॅड. अमर सिसोदिया, तसेच पैरवी अधिकारी एल. आर. कदम व समन्वय अधिकारी पोलीस उप निरीक्षक कृष्णा वासुदेव पाटील यांचे सहकार्य लाभले.