

धुळे : सोशल मीडियावरून कमी दरात फेक करन्सी, सोने, तांब्याची तार व अन्य वस्तू मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत 20 जणांविरोधात, तर धुळे तालुक्यातील एका प्रकरणात 4 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व रील्सपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
धुळे तालुक्यातील अजनाळे व साक्री तालुक्यातील जामदा परिसरामध्ये सोशल मीडियावर कमी दरात वस्तू व करन्सी देण्याचे आमिष दाखवले जात आहे. यामध्ये फसवून लोकांना बोलवले जात असून, त्यांच्यावर हल्ला करून रोकड हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात लूट झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर इंस्टाग्राम व फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून बनावट नोटांच्या विक्रीसंबंधी पोस्ट व रील्स व्हायरल केल्या जात असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रवीण दामू पवार यांच्या तक्रारीवरून 16 जणांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल तर प्रवीण पवार यांच्या तक्रारीवरून 4 जणांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस कर्मचारी संतोष देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 4 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना अशा बनावट सोशल मीडिया पोस्ट आणि रील्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तातडीने संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
धुळे तालुक्यातील अजनाळे, हेंकळवाडी, कुसुंबा तर साक्री तालुक्यातील जामदा, टिटाणे, निजामपूर या भागांमध्ये डिजिटल बॅनर व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सजग करण्यात येईल, जनजागृतीसाठी येथील भागांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कारवाईत परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख, एलसीबी निरीक्षक श्रीराम पवार, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, मयुर भामरे, प्रतिक कोळी आणि पोलीस पथकातील कर्मचारी सहभागी आहेत.