धुळे : वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षेमध्ये अपेक्षित रँक न मिळाल्याने एमबीबीएसचे शिक्षण घेतलेल्या तरुण डॉक्टरने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना शिरपूरमध्ये घडली. विशेष म्हणजे त्याने मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्याने जीवनात अयशस्वी झाल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेतील तणावाचा विषय ऐरणीवर आला आहे.
शिरपूर येथील विद्याविहार कॉलनीमध्ये शिक्षक असणारे चंद्रकांत पवार हे परिवारासह राहतात. त्यांची पत्नी मनीषा यादेखील शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा आयुष पवार याने एमबीबीएसचे शिक्षण मुंबई येथील केईएम रुग्णालयात पूर्ण केले. आयुष हा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करीत होता. यासाठी त्यांनी प्रवेश परीक्षा दिली. यात पहिल्या राऊंडमध्ये त्याला 1300 रँक मिळाली. त्यामुळे त्याला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवणे शक्य झाले नाही. या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता.
यातून त्याने घरात स्वयंपाक घराजवळील एका बंद खोलीमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे दिसले. हा दरवाजा त्याने आतून बंद केला होता. परिवाराने दरवाजा बंद असल्याचे पाहून संशय आल्याने खिडकीमधून पाहिले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. गल्लीत राहणारे सौरव मोरे, रोहित राजपूत, प्रीतम राजपूत हे पवार यांच्या घरात गेले असता त्यांना देखील हा दुर्दैवी प्रसंग कळाला. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली असून या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
दरम्यान गळफास घेण्यापूर्वी आयुष याने एक चिठ्ठी लिहिल्याचे दिसून आले आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने आपण अयशस्वी झालो असून आपल्या मृत्यूला कुणासही जबाबदार धरू नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच मम्मी पापा, दादा आय लव्ह यू, असे देखील नमूद केले आहे.
दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय शाखेमधील प्रवेश परीक्षे संदर्भात विद्यार्थ्यांवर असणारा ताणतणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तणाव न घेता या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.