Woman Professor Misbehavior SBI Bank Officer
धुळे: मराठी भाषिकांना हिणवण्याचा प्रकार आता धुळ्यासारख्या शहरात देखील येऊन पोहोचला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोद नगर शाखेमध्ये गेलेल्या मराठी भाषिक प्राध्यापिकेला हिंदी भाषिक ब्रांच मॅनेजरने भाषेवरून अपमानजनक वागणूक दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांवरच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी डिवचण्याचा प्रकार केला. यातून झालेला वाद पुन्हा पोलीस ठाण्यात पोहोचला. मात्र, यावेळी मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांवरच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार होत असताना अज्ञात व्यक्तींचे अनेक फोन संबंधितांना आले. त्यामुळे समझौता होण्याचा ऐवजी हा वाद विकोपाला पोहोचला.
धुळे येथील जयहिंद कॉलनीमधे स्टेट बँकेची प्रमोदनगर शाखा आहे. या शाखेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्राध्यापिका इंगळे या पोहोचल्या. मात्र बँकेची वेळ संपली आहे, असे साध्या भाषेत सांगण्याऐवजी इंगळे यांना ब्रांच मॅनेजर गांधी यांनी हिंदी मधून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. विशेष म्हणजे पैसे डिपॉझिट करण्यासाठी आलेल्या इंगळेंवर त्यांनी तुम्ही दरोडा घालण्यासाठी आला आहात, असा आरोप करीत गांधी यांनी हिंदी भाषेतून मराठी भाषेला हिणवण्याचे प्रकार देखील केले. त्यामुळे संतापलेल्या इंगळे यांनी देखील गांधी यांना त्यांची जागा दाखवली. यावेळी थेट 112 क्रमांकावरून इंगळे आणि गांधी यांनी स्वतंत्रपणे तक्रार केली.
परिणामी हा वाद देवपूर पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी पोलिसांनी तक्रारदारांना समजूत घालण्याचे काम केले. त्यामुळे इंगळे या पोलीस ठाण्यातून निघून गेल्या. मात्र त्या जाताच गांधी यांनी दिलेली अदखल पात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली. विशेष म्हणजे आपल्याला तक्रार द्यायची नाही, असे इंगळेंनी सांगितल्याचे देखील नोंदवून घेण्यात आले. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यामुळे आज चौथ्या दिवशी इंगळे यांनी ही व्यथा शिवसैनिकांकडे मांडली. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, तसेच महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह अन्य शिवसैनिक बँकेच्या शाखेत पोहोचले.
मात्र, यावेळी गांधी हे उपलब्ध नसल्याची माहिती बँकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र घटना घडताना इंगळे यांना आणखी अपमान जनक वागणूक देणाऱ्या मराठी भाषेक कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधण्याची इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली. त्यानुसार तो कर्मचारी बँकेच्या व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये आला. यावेळी त्याच्या समवेत संवाद साधणाऱ्या शिवसैनिकांना राजकीय हेतूने शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रकार या कर्मचाऱ्याने केला. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. यापैकी दोघांनी थेट या कर्मचाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढला. त्यामुळे पुन्हा हा वाद देवपूर पोलीस ठाण्यात पोहोचला.
यावेळी बँकेच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने अपमान जनक शब्दात विनयभंग केल्याची तक्रार संबंधित महिलेने दिली. तर बँकेच्या वतीने शासकीय कामात अडथळा आणल्याची तसेच मारहाण केल्याची तक्रार बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी दिलेली तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे काही काळ बाचाबाची झाली. मात्र मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनाच पोलीस ठाण्यात रात्र काढण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
देवपूर पोलीस ठाण्यात या दोन्ही गटांमध्ये समझौता होण्याची स्थिती असतानाच अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या संबंधितांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करणे सुरू केले. यानंतर हा वाद विकोपाला पोहोचला. विशेष म्हणजे शिवसैनिकांची तक्रार घेण्याची तयारी असणाऱ्या पोलीसांनी या फोन नंतर शिवसैनिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तसेच गंभीर कलमे लावून शिवसैनिकांना ताब्यात घेतले.