

धुळे : धुळे शहरात वाढत्या मोकाट श्वानांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची जबाबदारी कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या नोंदणीकृत संस्थेला देण्यात आली असून, वरखेडी रोडवरील ॲनिमल बर्थ कंट्रोल (ABC) सेंटरमध्ये ही मोहीम राबवली जात आहे.
धुळे शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट श्वानांचा त्रास वाढला आहे. अलिकडच्या काळात त्यांच्या हल्ल्यांमध्ये बालकांसह अनेकांचे जीवही गेले. त्यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील आणि प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत ही मोहीम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
या मोहिमेमध्ये मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण केले जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर श्वानांना तीन ते चार दिवस देखरेखीखाली ठेवले जाईल आणि त्यानंतर त्यांना मूळ ठिकाणी परत सोडले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया प्राणी कल्याण संस्था – सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन तर्फे पार पडणार आहे. ही संस्था ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करत आहे. महापालिकेने शहरवासीयांना आवाहन केले आहे की, या मोहिमेला सहकार्य करावे, सार्वजनिक ठिकाणी उष्टे अन्न, हाडे-मांस फेकू नये, मोकाट श्वानांच्या हल्ल्यांपासून खबरदारी घ्यावी, तसेच लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना एकटे सोडू नये. या मोहिमेद्वारे भविष्यात मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित करण्याचे उद्दिष्ट धुळे महापालिकेने ठेवले आहे.