Dhule Panchayat Samiti Education Officer bribe case
धुळे : मुलांच्या संख्या उपस्थितीचा अहवाल अपेक्षेप्रमाणे पाठवण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या धुळे येथील पंचायत समिती मधील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे धुळे तालुक्यातील चांदे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असुन त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे. दि.७. ऑगस्ट रोजी शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी तक्रारदार यांच्या शाळेस भेट दिली होती. या दिवशी विदयार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले.
या संदर्भातील तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी कुवर यांच्या करीता १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाली. या तक्रारीची उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी पंचांच्या मदतीने पडताळणी केली असता रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करीता व शिक्षण अधिकारी कुवर यांच्याकरीता १० हजार रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर आज पंचायत समिती मधील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांच्या दालनाजवळ सापळा लावण्यात आला. यावेळी नांद्रे यांनी कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडुन स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.