

धुळे : खानदेशातील महत्त्वपूर्ण व पवित्र सण असलेल्या दशा माता व कानबाई उत्सवाच्या निमित्ताने शनिवार (दि.2) आज नदीपात्रातील विसर्जन स्थळांची पाहणी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी केली.
खानदेशात दशामाता उत्सव व कानबाई उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दोन्ही उत्सवांमध्ये देवीच्या मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम नदीच्या पात्रात केला जातो. सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी विसर्जन स्थळाची पाहणी केली.
नदीपात्रातील स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था तसेच अनुषंगिक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ही पाहणी आयोजित करण्यात आलेली होती. यात श्री स्वामी समर्थ मंदिर शिवाजी रोड, पाताळे घाट तसेच अग्रवाल भवन येथील घाट या स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक ती उपायोजना व कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
या पहाणी प्रसंगी अभियंता चंद्रकांत उगले, नरेंद्र बागुल, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, रुपेश पवार ,विकास साळवे ,गजानन चौधरी, साईनाथ वाघ, प्रसाद जाधव तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.