Dhule Police Bribery Case
धुळे: फसवणुकीच्या संदर्भातील अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी ४० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या धुळे येथील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे.
या संदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे संबंधित तक्रारदाराने लाच मागितल्याची माहिती दिली होती. तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावे मौजे वलवाडी येथे घर आहे. धुळे येथील एका दाम्पत्याने या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन सन २०१५ मध्ये फायनान्स कंपनीकडून परस्पर ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेवून सासऱ्यांची फसवणूक केल्याने तक्रारदार यांनी धुळे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज केला होता. तत्पूर्वी त्यांनी धुळे येथील पोलीस प्रशासनाला पत्र देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या या दांपत्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली होती. मात्र पोलिसांनी वेळकाढू भूमिका घेत हा गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली होती. त्यामुळे संबंधित घर मालकाने न्यायालयात धाव घेतली होती.
या संदर्भात न्यायालयाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला तक्रारदार यांच्या सासऱ्याने पोलिसांकडे केलेल्या अर्जावर काय कारवाई केली. या संदर्भातील अहवाल मागवला होता. हा अहवाल देण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर यांना सोपविण्यात आले होते. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांचा तक्रारदार यांच्या सासर्यासमवेत संपर्क झाला. न्यायालयात या अर्जावर तक्रारदार यांच्या सासऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याबाबत सकारात्मक अहवाल कोर्टात पाठविण्यासाठी उपनिरीक्षक तळेकर यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता या संबंधित पोलिसांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे ही रक्कम पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात देण्याचे देखील ठरले. त्यामुळे सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक यशवंत बोरसे व पद्मावती कलाल तसेच पोहेकॉ राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, पोकॉ रामदास बारेला यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावला.
यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्या सासऱ्याकडून पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्या सांगण्यानुसार पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे यांना देण्याचे सांगण्यात आले. ही रक्कम देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सादरे यांना रंगेहात पकडले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक तळेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.