Burai River Water Release
धुळे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टचार मंत्री जयकुमार रावल यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील वाडीशेवाडी मध्यम प्रकल्पातून बुराई नदीच्या पात्रात 150.725 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठच्या 25 गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर वाडीशेवाडी मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्यातून 150.725 दलघफू पाणी आवर्तन स्वरूपात सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पात 698.74 दशलक्ष घनफूट उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागांनी पाणी सोडण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
तसेच तहसीलदार, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांनी समन्वय ठेवून पाणी गावांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील अनेक गावांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.