धुळे : धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरातील रस्त्याच्या लगत व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटवताना वाहतूक शाखेचे पोलीस आणि विक्रेते यांच्यात झटापट झाली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आला. या झटापटीमध्ये जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विक्रेत्यांनी मारहाण करणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली आहे. पण पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
धुळ्यातील दत्त मंदिर परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून रस्त्याच्या लगत भाजीपाला विक्रेत्यांनी आपले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून व्यवसाय सुरू केला आहे. देवपूर परिसरातील नागरिकांना भाजीपाला घेण्यासाठी शहरातील पाच कंदील तसेच नेहरू चौक भागात यावे लागत होते . या सर्व नागरिकांना दत्त मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्यांमुळे सुविधा मिळाली. मात्र या ठिकाणी लावण्यात येणारी वाहने आणि रस्त्यालगत होणारी गर्दी पाहता रहदारीला देखील अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मध्यस्थीने याच परिसरामध्ये असलेल्या एका मैदानामध्ये या भाजी विक्रेत्यांना व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली.
काही महिने या नवीन जागेत विक्रेत्यांनी व्यवसाय केला. मात्र या मैदानामध्ये येणारे सांडपाणी तसेच महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे या व्यवसायिकांना या ठिकाणी भाजी विक्री करणे कठीण झाले. त्यामुळे पुन्हा या विक्रेत्यांनी पूर्वीच्याच जागेवर आपला व्यवसाय सुरू केला. आज अचानक शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे हे फौज फाट्यासह या ठिकाणी पोहोचले. यावेळी विक्रेत्यांनी त्यांची बाजू वारे यांच्यासमोर मांडली. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे या ठिकाणी रस्त्यालगत आपण व्यवसाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिसांनी रस्त्यालगत असणाऱ्या खड्ड्यामध्ये मुरूम स्वतःच्या खर्चाने टाकून त्या ठिकाणी व्यवसाय करावा, असे सुचवले. मात्र हातावर पोट असणाऱ्या या विक्रेत्यांना एवढा खर्च करणे परवडणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. ही चर्चा सुरू असतानाच अचानक पोलिसांनी भाजीपाला जप्त करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे विरोध करणाऱ्या विक्रेत्यांना देखील हटवण्यास सुरुवात झाली. यावेळी विक्रेते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. रोजगाराचे साधन नष्ट होत असल्याचे पाहून एका महिला विक्रेत्याला अचानक त्रास सुरू झाला. ती जमिनीवर कोसळली. त्यामुळे तिला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या झटापटीमध्ये पोलिसांनी विक्रेत्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे काही काळ भाजी विक्रेत्यांनी आंदोलनाची भूमिका देखील घेतली. बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र पोलिसांकडून कोणतीही मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
उशिरापर्यंत या वादावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. वाहतूक पोलिसांनी या विक्रेत्यांचा भाजीपाला जप्त करून कारवाई केली. मात्र या दरम्यान विक्रेत्यांच्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. अनेकांना नुकसान होत असल्याने आपले अश्रू अनावर झाले.