Heatwave Alert Pudhari
धुळे

Dhule Heatwave | धुळ्याचा पारा 45.1 अंशावर: शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात नियंत्रण कक्ष सुरु

धुळे जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरूच असून यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त म्हणजेच 45.1 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

45 Degree Temperature Dhule

धुळे : धुळे जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरूच असून यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त म्हणजेच 45.1 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे .दरम्यान आरोग्य विभागाने उष्माघात नियंत्रण कक्षाची निर्मिती केली असून कुणालाही त्रास जाणवल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी केले आहे.

हवामान खात्याच्या माध्यमातून राज्यात उष्णतेची लाट असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा प्रत्यय धुळेकरांना येतो आहे. गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू असून आज 45.1अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात जास्त तापमान असून नागरिक तीव्र उकाड्याने हैराण झाले आहेत.

उन्हामुळे शहराची मुख्य बाजारपेठ असणारा पाच कंदील चौकात तुरळक गर्दी दिसून येत आहे. तर दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. वाढत्या तापमानाचा स्तर पाहता आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भडांगे यांनी उष्माघात नियंत्रण कक्ष संदर्भातील माहिती दिली आहे.

धुळे शहरात असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात पाच खाटा तसेच दोंडाईचा आणि शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सोनगीर, थाळनेर, शिंदखेडा, जैताणे, पिंपळनेर आणि साक्री येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन खाटा उष्माघात नियंत्रण कक्षासाठी तयार करण्यात आल्या आहेत.

या सर्व विशेष कक्षांमध्ये कुलरची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक तो सर्व औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. या सर्व कक्षांमध्ये 24 तास सेवा देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली आहे. नागरिकांनी त्यांना उन्हाचा त्रास जाणवल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT