शिरपूरमधून चोरीस गेलेल्या दोन हायवा ट्रक प्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली Pudhari
धुळे

Dhule Crime | शिरपूर ट्रक चोरी प्रकरण: राजस्थानातून चौघांना अटक; १ कोटी १० लाखाचा मुद्देमाल जप्त

शिरपूर ते राजस्थानपर्यंत तांत्रिक तपासातून पोलिसांना यश

पुढारी वृत्तसेवा

Shirpur Truck Theft

धुळे : शिरपूर शहरातून चोरीस गेलेल्या दोन हायवा ट्रक प्रकरणाचा तपास थेट राजस्थान राज्यापर्यंत पोहोचला असून तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन ट्रक व चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

दोन हायवा ट्रक चोरीला

शिरपूर शहरातील मिलिंदनगर येथे राहणारे प्रदीप लक्ष्मण चौधरी यांचा टाटा कंपनीचा सिग्ना मॉडेल (क्र. एमएच-१८ बीझेड ५११४) पांढऱ्या रंगाचा मालवाहू हायवा डंपर तसेच मारवाडी गल्लीतील अमन अश्विन कटारिया यांचा टाटा सिग्ना ३५३२ मॉडेल (क्र. एमएच-१८ बीएच १७१८) पांढऱ्या रंगाचा हायवा डंपर चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायबर व तांत्रिक तपासाची मदत

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी सायबर शाखेला तपासात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिरपूर शहर पोलीस व सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी विशेष पथक गठीत करून तपासाला गती दिली.

या पथकाने शिरपूरपासून मध्यप्रदेशमार्गे राजस्थानातील भिलवाडा परिसरापर्यंत शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. विविध टोल नाक्यांवरील नोंदींची पडताळणी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण व गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपासाचा माग काढण्यात आला.

राजस्थानातून आरोपी जेरबंद

तपासादरम्यान चोरीप्रकरणी इरफान उस्मान मेव (रा. बडका, ता. नूह, हरियाणा), नियामत दिनू मेव (रा. हातीन, जि. पलवल, हरियाणा), कालू गुफुरखा मेव (सध्या मुक्काम हुसेन कॉलनी, भिलवाडा, राजस्थान) आणि महावीर प्रसाद भवनलाल शर्मा (रा. पानसल, जि. भिलवाडा, राजस्थान) या चौघांना राजस्थानातून अटक करण्यात आली.

या कारवाईसाठी राजस्थानमधील स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले दोन्ही हायवा ट्रक हस्तगत करण्यात आले.

तसेच आरोपींनी राजस्थानहून शिरपूर येथे चोरी करण्यासाठी वापरलेली बलेनो कारही जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी १० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT