Dhule Crime | शिरपूर मधील सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या मालेगाव मधील बुरखा गॅंगला अटक 
धुळे

Dhule Crime | शिरपूर मधील सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या मालेगाव मधील बुरखा गॅंगला अटक

गँगने चोरीचा ऐवज मुंबई येथील सराफाला विकल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

धुळे: शिरपूर येथील सराफा दुकानातून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या बुरखाधारी गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. ही टोळी मालेगाव शहरातील असून त्यांनी मुंबई येथील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी केल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. या गँगने चोरीचा ऐवज मुंबई येथील सराफाला विकला असून त्याच्या ताब्यातून सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. चोरट्यांकडून सुमारे नऊ लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील महात्मा गांधी कॉम्प्लेक्स दुकान नं.5/6 वरील नंदुरबारकर सराफ दुकानातून 3 अनोळखी बुरखाधारी महिलांनी 6 लाख रूपये किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे 8 जोड दागिने चोरून नेल्याची तक्रार सुरेंद्र सन्मुखलाल सराफ यांनी दिल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे बिएनएस कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी वरीष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार शिरपूर शहर पोलीस ठाणे येथिल शोध पथकास सुचना देवून त्याप्रमाणे वेगाने तपासचक्रे फिरवली. गुन्ह्याचे घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्या आधारावर बुरखा धारी गॅंगचा माग काढण्यास सुरुवात केली.यात गुन्हा करणाऱ्या बुरखाधारी महिला या एका स्विफ्ट डिझायर कारने जातांना दिसल्याने वाहनाचा नंबर मिळवुन त्याचे फास्टंगची माहिती प्राप्त केली. या महिला गुन्हा करतांना वापरलेल्या स्विफ्ट डिझायर कारने मालेगावकडुन इंदौरकडे जात असल्या बाबत मिळालेल्या गोपनिय माहिती वरून त्यांना सापळा लावुन शिताफीने शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ संशयीत महिलांना पकडले.

प्राथमिक चौकशी केली असता त्यांची नावे अन्नु ऊर्फ साजिदा बशीर खान (रा. कमालपुरा, मालेगाव) , मन्नु ऊर्फ मुनसजा शेख गमीर, रीजवाना जाकीर शेख (दोन्ही रा. विजय नगर, इकबाल डाबी जवळ, मालेगाव) व चालक नदिम शेख गवासोद्दिन शेख( रा. अयुब नगर, मालेगाव) अशी असल्याची निदर्शनास आले. त्यांना विश्वासात घेवुन या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना चौकशीसाठी न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

या आरोपींची पोलीस कस्टडीमध्ये विश्वासात घेवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माला बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरून नेलेले सोन्याचे कानातील दागिने हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील सराफा दुकानदारास विक्री केल्याचे सांगीतले. या ठिकाणी जावुन सराफा दुकानदार इंदेरचंद किशनजी मेहता यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माला बाबत विचारपूस करता त्यांनी सदरच्या महिला आरोपींकडून सोन्याचे कानातील दागिने खरेदी केल्याची कबुली देवून दागिन्यांची लगड बनवुन ठेवल्याचे सांगुन ती समक्ष हजर केली.

पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 40 ग्रॅम सोने आणि अन्य आईवर असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपी अन्नु ऊर्फ साजिदा बशीर खान यांच्या विरोधात मुंबई येथील नागपाडा पोलीस ठाण्यात तीन तर कुर्ला पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून आरोपी मन्नू ऊर्फ मुनसजा शेख गमीर विरोधात देखील कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT