Shirpur Illegal Ganja Farming Pudhari
धुळे

Dhule Ganja Seized | शिरपूरच्या वनजमिनीवरील गांजाची शेती उद्ध्वस्त! १ कोटी ५२ लाखांचा ६१० किलो गांजा जप्त

आंबापाडा शिवारातील वनजमिनीवर बेकायदेशीर लागवड; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Shirpur Illegal Ganja Farming

धुळे : शिरपूर तालुक्यातील आंबापाडा शिवारात वनजमिनीवर सुरू असलेली गांजाची बेकायदेशीर शेती पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल ६१० किलो वजनाचे गांजाचे पीक जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करणारे आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

गोपनीय माहितीवरून डोंगराळ भागात छापा

शिरपूर तालुक्यातील आंबाफाटा गावाच्या पुढे असलेल्या डोंगराळ परिसरातील वनपट्ट्याच्या जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित कॅनॅबिस (गांजा) वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित वनजमिनीवर छापा टाकला.

यावेळी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण गांजाचे पीक जप्त केले.

६१० किलो गांजा जप्त; कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत

या छापेमारीत पोलिसांनी सुमारे ६१० किलो वजनाचे गांजाचे पीक जप्त केले. जप्त केलेल्या गांजाची अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वनजमिनीसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड होत असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मोठ्या पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अंमलदार अतुल पाटील, मनोज पाटील, अनिल सोनार, पवन ईशी, रविंद्र अखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, भटू साळुंके, विनोद अखडमल, सचिन वाघ, आरिफ तडवी, गोपाल माळी, सतीश भामरे, दादाभाई बोरसे, निलेश चौधरी, प्रशांत बाविस्कर, अनिता पवार, रविंद्र महाले, जगन्नाथ कोळी आणि होमगार्ड मिथुन पवार यांनी सहभाग घेतला.

वनजमिनीवर गांजाची शेती करणारे कोण?

या प्रकरणात शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनजमिनीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड कोणी केली, त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का आणि या अवैध व्यवसायाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. कोट्यवधींच्या गांजा शेतीमागील सूत्रधारांचा शोध घेणे हे आता पोलिसांसमोरचे प्रमुख आव्हान ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT