Crime News Pudhari file photo
धुळे

Dhule Crime | पुतणीशी बोलण्यावरून वाद; झटापटीत काकाचा मृत्यू, आरोपी अटकेत

साक्री तालुक्यातील राईनपाडा शिवारातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Sakri taluka uncle dies

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील राईनपाडा शिवारात पुतणीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राईनपाडा शिवारातील हनुमंतपाडा येथे किसन गुलाब साबळे (वय २२) हा सोमवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास गावातील एका किराणा दुकानाजवळ एका तरुणीशी बोलत उभा होता. त्याचवेळी त्या तरुणीचे काका दत्तू सोमा गवळी तेथे आले. त्यांनी साबळे याला पुतणीशी का बोलत आहे, असा जाब विचारत तेथून निघून जाण्यास सांगितले.

यानंतर साबळे तेथून निघून गेला. मात्र सुमारे पंधरा मिनिटांनंतर तो पुन्हा त्या ठिकाणी आला. यावेळी दत्तू गवळी व किसन साबळे यांच्यात वाद होऊन झटापट झाली. झटापटीदरम्यान साबळे याने गवळी यांना ढकलल्याने ते खाली पडले. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात किसन साबळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय किरण बर्गे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत संशयित किसन साबळे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT