Sakri Crop Damage Compensation
पिंपळनेर : साक्री तालुक्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या १६ गावांतील सुमारे ३२५० शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाईचा दिलासा मिळणार आहे. यासाठी २ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दि. १८ व १९ मार्च रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील कांदा, गहू, मका, हरभरा, ज्वारी, बाजरी यांसह डाळिंब, लिंबू, पपई, केळी, टरबूज आदी पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. काढणीस आलेली पिके जमीनदोस्त झाली, तर काढणी करून ठेवलेला हरभरा व इतर शेतीमाल पावसामुळे भिजून खराब झाला. अनेक भागांत शेतांमध्ये गारांचा खच साचल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
प्राथमिक पंचनाम्यानुसार साक्री तालुक्यातील १६ गावांमधील सुमारे १६८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले होते. भाजीपाला पिके पूर्णपणे नष्ट झाली, तर फळबागांमधील फळगळ झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार मंजुळाताई गावित यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांनाही निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या होत्या. याशिवाय मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन साक्री तालुक्यातील नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने मदतीस मंजुरी दिली आहे. नाडसे, बेहेड, कोकले, नांदवण, नागपूर, दारखेल, कावठे, अष्टाणे, पेरेजपूर, भाडणे, साक्री, अंबापूर, कळंभीर, बळसाणे, ऐचाळे, इंदवे, गोदास आणि घोडदे आदी गावांतील सुमारे ३२५० शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
रब्बी हंगामातील उभी पिके एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. खत, बियाणे आणि मजुरीवर झालेला खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अशा परिस्थितीत शासनाकडून मंजूर झालेली ही मदत शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे.