धुळे : धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमला जोरदार धक्का देत धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार फारुक शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘घड्याळ’ हाती घेतले. फारुक शाह हे मागील निवडणुकीत भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याविरोधात लढले होते आणि दुसऱ्या क्रमांकाची लक्षवेधी मते घेतली होती.
आता शाह यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपासाठी धुळे शहरात नवे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषतः अग्रवाल आणि शाह यांच्यातील वैर वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या वादातून उफाळून आले होते, ज्याचा परिणाम विधानसभा निकालावरही झाला होता.
याआधी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशा घडामोडींमुळे धुळे शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. एमआयएमच्या पतंगाला कात्री लावून, राष्ट्रवादीने या भागात आपले बळ वाढवले आहे. परिणामी, भाजपाच्या अनुप अग्रवाल यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.