जिल्हा पुरवठा अधिकारी बागडे यांनी ओम गॅस एजन्सीला भेट देत पाहणी केली Pudhari
धुळे

Dhule News | धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस; ग्राहकांच्या तक्रारीनंतर कारवाई

जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांच्याकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Gas Cylinder Supply Issues

धुळे : ग्राहकांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विहीत कालमर्यादेत न करणे आणि ग्राहकांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी धुळे येथील ओम गॅस एजन्सीच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी बागडे यांनी संबंधित गॅस एजन्सीला भेट देत पाहणी केली.

जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला होता. या कक्षाकडे संबंधित एजन्सीच्या सेवेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी बागडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षा महाजन, पुरवठा कर्मचारी शिरीष पवार, खैरनार, रवींद्र भदाणे आदींनी आज गॅस् एजन्सीला भेट देत पाहणी केली. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

या नोटिसीत म्हटले आहे की, ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर विहीत कालावधीत सिलिंडरचा पुरवठा केला जात नाही. याबाबत ग्राहकांमध्ये आपल्या एजन्सीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवेबाबत असंतोष आहे. त्यानुसार आज चौकशीकामी भेट दिली असता कार्यालय बंद आढळून आले. आपल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यावर कार्यालय उघडण्यात आले. २२०० ग्राहकांनी सिलिंडरसाठी नोंदणी केली आहे. मात्र, त्यांना अद्यापही सिलिंडरचा पुरवठा केलेला नाही. २५ दिवसांपासूनची प्रतीक्षा यादी प्रलंबित आहे.

येत्या दोन दिवसांत ३५० सिलिंडर येणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील सर्व ग्राहकांची सिलिंडरची गरज भागणार नाही. प्रतीक्षा यादीतील उर्वरित ग्राहकांना गॅस सिलिंडर वितरणाबाबत कोणतेही नियोजन नाही. तसेच रोज प्रतीक्षा यादीतील ग्राहकांची संख्या वाढत जाणार आहे. त्यांना विहित कालावधीत गॅस सिलिंडर न मिळाल्यास गॅस एजन्सीच्या सेवेबाबत अधिक असंतोष निर्माण होईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

ढिसाळ नियोजन व सिलिंडर वाटपास होणाऱ्या विलंबामुळे गॅस एजन्सीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई का करण्यात येऊ नये?, तसेच गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीकडे का पाठवू नये, याचा खुलासा ३० मार्च २०२६ पर्यंत करावा, असेही या नोटिसीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT