धुळे : पुढारी वृत्तसेवा- शेतकरी आणि आदिवासींच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून काढण्यात आलेले लाल वादळ आज धुळ्यात येऊन धडकले. मुंबई येथील मंत्रालयावर सत्यशोधक शेतकरी संघटना आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या माध्यमातून पायी बिढार मोर्चा काढण्यात आला आहे. आज सायंकाळी हा मोर्चा धुळ्यात येऊन धडकला. जेल रोडवर या निमित्ताने झालेल्या सभेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.
नंदुरबार ते मुंबई असा सुमारे 432 किलोमीटर दरम्यान हा पायी बिढार मोर्चा काढण्यात आला आहे. नंदुरबार येथून सुरू झालेला हा मोर्चा आज सायंकाळी धुळ्यात येऊन धडकला. धुळ्याच्या जेल रोडवर या निमित्ताने सभा घेण्यात येऊन सरकार शेतकरी आणि आदिवासींच्या विरोधात धोरण राबवत असल्याचा आरोप करण्यात आला .या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड सुभाष काकुस्ते ,रामसिंग गावित हे करीत आहेत. धुळ्यात या मोर्चाला आनंद लोंढे, विशाल साळवे यांच्यासह डाव्या आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत मोर्चात सहभाग नोंदवला .
यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या वतीने झालेल्या सभेत सरकार हे शेतकरी आणि आदिवासींच्या विरोधात धोरण राबवत असल्याचा आरोप करण्यात आला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळाचे सावट पसरले आहे. मात्र सरकारने मोजक्याच मंडळांना दुष्काळी यादीत टाकले आहे. वास्तविक पाहता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सवलती देणे आवश्यक असताना त्यांनी शेतकरी विरोधात धोरण राबवले आहे. असा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींचे वन हक्क दावे हे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. वास्तविक पाहता वन हक्क दाव्यांचा कायदा 2006 आणि सुधारित कायदा 2012 च्या नुसार दोन पुराव्यांच्या आधारे वन हक्क दावे पात्र करावेत ,असे स्पष्ट असताना देखील त्यात दिरंगाई केली जात आहे .त्यामुळे आदिवासींना त्यांची हक्काचा सातबारा मिळावा अशी मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली आहे .या सर्व मागण्यांसाठी आता मुंबई येथील मंत्रालयावर हा मोर्चा काढला जातो आहे. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही ,असा निर्धार देखील यावेळी करण्यात आला.
हेही वाचा :