धुळे : धुळे जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी सुसंगत आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. जिल्ह्यात रस्ते, पुल, शासकीय इमारती यांचा एकत्रित आराखडा तयार करून दळणवळण सुलभ करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पीएमजीएसवाय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, सीईओ विशाल नरवाडे, पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विकसित महाराष्ट्र 2047" या राज्य शासनाच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या पार्श्वभूमीवर 'धुळे जिल्हा विकास आराखडा' तयार होणार आहे. यासाठी सर्व रस्ते, पुल, नवीन प्रस्तावित रस्ते व इमारती यांचा एकत्रित व सर्वसमावेशक अभ्यास करून आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री रावल यांनी दिले.
जुने व नवीन रस्ते, पाणंद रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे जाळे तयार करून मुख्य मार्गांशी जोडणी करावी.
धुळे शहरात मोठ्या पुलांच्या शेजारी नवीन पूल बांधावेत आणि त्यांच्या बांधकामात गुणवत्ता राखावी.
तापीवरील गिधाडे पुलावर चेअरींग जाळी बसवावी.
शासकीय इमारतीत आधुनिक सुविधा असाव्यात; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था करावी.
दोंडाईचात 100 खाटांचे रुग्णालय व राष्ट्रीय महामार्गावर नवीन विश्रामगृह उभारण्याचे निर्देश.
वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे.
सर्व कामांच्या ठिकाणी फलक लावावेत आणि कामांची नियमित पाहणी करावी.
अपघातप्रवण भागांवर उपाययोजना करावी.
ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी अशा इमारतींसाठी आवश्यक सुविधा असलेला विस्तृत आराखडा तयार करावा.
पालकमंत्र्यांनी विभागीय समन्वयाने कार्यवाही करून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याचे निर्देश दिले.