धुळे

Dhule News : गुटखा तस्करांना पुन्हा दणका, पिंपळनेरच्या तिघांना बेड्या 

गणेश सोनवणे

धुळे ; पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील गुटखा तस्करांना आज सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दणका दिला आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे गुटख्याची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी बेड्या ठोकल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करी मोडून काढणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पाऊल उचलले आहे .या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल गुटख्याची तस्करी करणारा कंटेनर जप्त करून यातून 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर आज सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करून 41 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात गुजरात राज्यातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच संजय पाटील, दिलीप खोंडे, संतोष हिरे, पंकज खैरमोडे ,मुकेश वाघ आदी पथकाला कारवाई करण्यासाठी आदेशित केले. या पथकाने साक्री तालुक्यातील वारसाकडे येणाऱ्या मार्गावर एमएच ४१ ए जी 24 72 या क्रमांकाची पिकप गाडी तसेच एम एच 24 ए एफ ०९९३ क्रमांकाची इको कारचा शोध सुरू केला. दरम्यान शेंदवड गावाजवळील हॉटेल कोकणी दरबार नजीक रस्त्याच्या कडेला या दोन्ही गाड्या पोलीस पथकाला आढळून आल्या. त्यामुळे पोलीस पथकाने पिंपळनेर येथे राहणारा पंकज कैलास भोई, रामजतन अवधराम प्रजापती यांना ताब्यात घेतले.

या दोघांच्या चौकशीतून हा साठा पिंपळनेर येथे राहणारा रवींद्र साबळे याचा असल्याचे सांगितले. दरम्यान या वाहनांची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा व तंबाखू असा 41 लाख 55 हजाराचा ऐवज आढळून आला आहे. त्यानुसार या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान धुळे जिल्ह्यातील गुटख्याची तस्करी मोडून काढणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. पोलीस तपासामध्ये आता गुटख्याचा म्होरक्या शोधला जाणार असल्याची देखील त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT