BJP NCP Clash Dhule Pudhari
धुळे

Dhule Municipal Election| धुळ्यात माघारीच्या कारणावरून भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले: धारदार हत्यार, गोळीबार केल्याचा आरोप

धुळे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून दोन दिवसांपासून गदारोळ सुरू

पुढारी वृत्तसेवा

BJP NCP Clash Dhule

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी माघारी घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या हाणामारीत धारदार हत्याराचा वापर करण्यात आला. तर गोळीबार होऊन एक जण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज धुंडाळून आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून दोन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. धुळे शहरालगत असणाऱ्या प्रभागांमध्ये उमेदवारांना माघारी घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून दडपण वापरले जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराच्या घराजवळ पोलिसांना पाचारण केले. यावेळी महिला आघाडीच्या शुभांगी पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी थेट भारतीय जनता पार्टीवर विरोधातील उमेदवारांवर दबाव आणल्याचा आरोप केला.

तर आज देवपूर परिसरातील प्रभाग चार आणि पाच येथील उमेदवारी माघारी घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपाचे या भागातील कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकले. यावेळी झालेल्या हाणामारीत राष्ट्रवादीचे रमेश बोरसे हे जखमी झाले. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांचे नातेवाईक उमेश कांबळे यांच्या पोटाला गोळी चाटुन गेल्याने ते जखमी झाल्याचा दावा करण्यात आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. आता या भागातील घटनास्थळावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान साक्री रोड परिसरात देखील अशाच प्रकारची नाट्यमय घटना घडली आहे. या प्रभागांमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला उमेदवार आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी थेट केंद्राच्या जवळ पोहोचल्या. मात्र यावेळी त्यांच्याच पॅनल मधील अन्य उमेदवारांनी थेट त्यांच्या पायाला हात लावून उमेदवारी मागे घेऊ नका, कोणत्याही दडपणाला बळी पडू नका, असे आवाहन करीत त्यांना माघारी घेण्यापासून रोखले.

दरम्यान या माघारी नाट्यावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाहीमध्ये उमेदवारी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच प्रमाणे अर्ज माघारी घेण्याचा देखील अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारावर अशाप्रकारे दडपण वापरून त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यापासून रोखणे हे योग्य नाही. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT