धुळे : आगामी धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर जोरदार टीका केली आहे. विशेषतः त्यांनी मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत, शहरात तब्बल २७ हजार बोगस मतदान झाल्याचा आणि १८ हजार मतदार दुबार, मयत किंवा स्थलांतरित झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गोटे यांनी म्हटले आहे की, या निवडणुका केवळ 'भ्रष्टाचार हटाव, महापालिका बचाव' आणि 'स्वच्छ शहर व भयमुक्त धुळे' या मुद्द्यांवरच लढविल्या पाहिजेत. येत्या १५ सप्टेंबर रोजी ते शहरातील डुप्लिकेट आणि मयत मतदारांची माहिती पुराव्यासह जनतेसमोर मांडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अनिल गोटे यांनी धुळ्यात गुन्हेगारीतून पैसा कमावणाऱ्या प्रवृत्ती राजकारणात येण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सट्टा, जुगार, हातभट्टी, गांजा अशा अवैध व्यवसायातून अमाप पैसा कमावणारे लोक समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पदांच्या मागे लागतात. सत्तेची लालसा असलेले काही पक्ष अशा लोकांना आपल्या पक्षात घेऊन, कोणत्याही मार्गाने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी पोलिसांना हाताशी धरले जाते आणि अधिकाऱ्यांची खरेदी केली जाते. अशा प्रवृत्तींना कोणताही विचार किंवा पक्ष नसतो, त्यांचे रक्षण करणाराच त्यांचा पक्ष असतो.”
गोटे यांनी नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील अलीकडील घडामोडींचा संदर्भ देत, चेहराहीन आंदोलनांनी देशाच्या सर्वोच्च नेत्यांना पळून जाण्यास भाग पाडले, ही बाब चिंताजनक असल्याचे म्हटले. “जर हे असेच सुरू राहिले तर भारतासाठीही तो दिवस दूर नाही. भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना जनता शोधून-शोधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
गोटे यांनी सर्व संभाव्य उमेदवारांना मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, धुळे शहर सोडून गेलेल्या किंवा मयत झालेल्या लोकांच्या नावावरही विधानसभा निवडणुकीत मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या गंभीर प्रकारावर १५ सप्टेंबर रोजी पुरावे सादर करण्याची त्यांची योजना आहे. प्रभाग तोडण्याच्या राजकारणात वेळ वाया न घालवता, प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
जनतेने ‘भ्रष्टाचार हटाव, महापालिका बचाव’, ‘आम्हाला चांगले रस्ते पाहिजेत’ आणि ‘गुंडगिरी मुक्त शहर’ या मुद्द्यांवरच उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.