

धुळे : जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरश्यांमध्ये 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृती दलाच्या अध्यक्षा भाग्यश्री विसपुते यांनी दिले.
जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये गोवरचे रुग्ण आढळले असून हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसतो. त्यामुळे शासनाने 15-30 सप्टेंबरदरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित, समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा तसेच मदरशांमध्ये 5 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे.
मोहिमेसाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, महिला व बालविकास विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग घ्यावा.
पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.
एका दिवसात एका आश्रमशाळेचे संपूर्ण लसीकरण पूर्ण करावे.
लसीकरणानंतर गुंतागुंत टाळण्यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी.
शाळांमध्ये ॲम्ब्युलन्स, स्वतंत्र लसीकरण कक्ष व प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले
डॉ. सचिन बोडके यांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेची सविस्तर माहिती दिली.