Dhule News file photo
धुळे

Dhule News: धुळे महानगरपालिकेचे १६ अधिकारी आणि कर्मचारी निलंबित, कामात कुचराई केल्याचा ठपका

धुळे महानगरपालिकेच्या कामकाजात कुचराई झाल्याचा ठपका ठेवत आयुक्त नितीन कापडणीस व महापौर मायादेवी परदेशी यांनी १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

पुढारी वृत्तसेवा

Dhule Municipal Corporation

धुळे: धुळे महानगरपालिकेच्या कामकाजात कुचराई झाल्याचा ठपका ठेवत आयुक्त नितीन कापडणीस व महापौर मायादेवी परदेशी यांनी आज १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या प्रामुख्याने स्वच्छता विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक तसेच मुकादम पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थापनात झालेल्या त्रुटींमुळे ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

विविध राजकीय पक्षांच्या विरोधकांकडून महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत सातत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचा साठा आणि निष्काळजीपणामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर कडक भूमिका घेत निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबन कालावधीत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून या आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, निलंबनासोबतच संबंधितांना सुधारण्यासाठी एक महिन्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. या कालावधीत कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्यास उपायुक्त (आरोग्य) यांनी संबंधितांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६(२) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत करण्यात आली आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे धुळे महापालिकेतील प्रशासनाने निष्काळजीपणा व कामातील हलगर्जीपणाबाबत शून्य सहनशीलतेचा स्पष्ट संदेश दिला आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

'या' अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई

या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव यांच्यासह स्वच्छता निरीक्षक गौतम गोयर, रुपेश पवार, सौजाद शेख, आसिफ बेग, अर्जुन जाधव, प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल जावडेकर यांचा समावेश आहे. मुकादम पदावरील आकाश चांगरे, चेतन गोयर, कैलास पाटील, साजित सिकंदर शेख, किशोर मोरे, दत्तात्रय माळी व सफर बेग यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT