Ratnagiri News : हद्दवाढीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवणार

राजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर; नवीन पाणीपुरवठा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष सभेचा निर्णय
Rajapur Municipal Council
Rajapur Municipal Council
Published on
Updated on

राजापूर : मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या राजापूर नगर परिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावाला पुन्हा नव्याने गती देण्याचा व शहराची हद्द वाढविण्यासाठी पुन्हा शासनाकडे नव्याने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचा एकमुखी ठराव मंगळवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला. नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या या सभेस अभिजीत कुंभार यांच्यासह नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

शहरातील नवीन पाणीपुरवठा डीपीआर कामात निर्माण होणाऱ्या अडचणी, पाणीसाठवण टाक्यांचा प्रश्न यांसह या कामासाठी होणारी रस्त्यांची खोदाई यावर चर्चा करून योग्यप्रकारे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच एका विशेष सभेचे आयोजन करण्याचा निर्णयही सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला. या सभेत शहराच्या हद्द वाढ प्रस्तावाला मंजुरी देण्याच्याा विषयावर चर्चा करण्यात आली. राजापूर शहरात लागू असलेल्या पूररेषेमुळे शासनाने पूररेषेत येणाऱ्या नागरिकांचे कोदवली साईनगर येथील पुनर्वसन वसाहतीत पुनर्वसन केले आहे. ही सगळी मंडळी शहरातीलच आहेत. त्यांना पाणी पुरवठ्यासह कचरा उचलणे व अन्य सुविधा या नगर परिषदच पुरवत आहे. त्यामुळे याच भागातील नागरिकांनी आम्हाला एका अर्जाद्वारे आम्हाला नगर परिषदेत सामावून घ्यावे अशी मागणी केलेली आहे.

कोंढेतड विभागातील काही भागातील नागरिक हे शहरात येतात. मात्र ते मालमत्ता कर हे ग्रामपंचायतीमध्ये भरत आहेत. त्यांनाही न. प. मध्ये सामावून घ्यावे तर रानतळे भागातील नव्याने अस्तित्वात आलेली वसाहत व धोपेश्वर चापडेवाडीतील भागाचा शहारात समावेश करावा अशी चर्चा यावेळी झाली. यामुळे शहराची लोकसंख्या वाढणार असून नगपरिषदेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. नगर परिषदेचा वर्ग बदल होऊन विकास निधीतही वाढ होणार आहे.

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनीही या प्रस्तावावर भूमिका मांडताना हे आवश्यक असल्याचे नमूद केले. या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, ॲड. जमीर खलिफे, सुलतान ठाकूर, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, सौरभ खडपे, महेश शिवलकर, सुभाष बाकाळकर, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण यांनी सहभाग घेत आपली मते मांडली. नगर परिषद दिव्यांग बांधवांसाठी 5 टक्के निधी खर्च करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी नव्याने नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ द्यावा असा निर्णय घेण्यात आला. मात्र ज्यांच्याकडे यूआयडी प्रमाणपत्र आहे त्यांनाही याचा लाभ द्यावा असेही नमूद करण्यात आले. यावेळी काही दिव्यांगांना अनेकवेळा लाभ देण्यात आल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. याबाबत प्रशासनाने काटेकोर पध्दतीने नियमांचे पालन करून अंमलबजावणी करावी असे निर्देश नगराध्यक्षा खलिफे यांनी दिले.

शहरात सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा डीपीआरच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. त्यामुळे रस्ते खराब होत आहेत, तर पाणीपुरवठा टाक्यांच्या बाबतही सुयोग्य नियोजन केले जात नाही. दिवटेवाडी येथील पाणी टाकी बसविण्याबाबतही योग्य पध्दतीने कार्यवाही केली जावी अशी मागणी बांधकाम सभापती सुबोध पवार यांनी केली, तर आंबेवाडी व रानतळे भागातील पाण्याच्या टाकीचा मुद्दाही पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी उपस्थित केला. यावर या योजनेची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी व्हावी व पाणीपुरवठयाचे सुयोग्य नियोजन करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी यासाठी संबधीत ठेकेदाराबरोबर चर्चा करून एक विशेष बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.

नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाकरिता आउटपुट बेसीसवर सेवा पुरवण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. नगर परिषद सभागृहातील स्पिकर व्यवस्था अद्ययावत करण्याचा, कार्यालयात इंटरकॉम सुविधा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला, तर नगर परिषदेला जेसीबी तसेच स्वच्छता विभागासाठी एक घंटागाडी घेण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात झालेल्या वेगवेगळया विषयांवरील चर्चेत नगरसेवक सौरभ पेणकर, प्रेरणा नार्वेंकर, उर्मिला बाकाळकर, सुयोगा जठार, साजिया काझी, अफरोज झारी, शबाना मुल्ला, सिध्दांत जाधव यांनी चर्चेंत सहभाग घेत आपली मते मांडली. प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी सभागृहात माहिती दिली, तर कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी प्रशासकीय अहवालांचे सभागृहात वाचन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news