MSEDCL recovery drive Dhule
धुळे : धुळे व नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात कृषी वर्गवारी वगळता महावितरणची 1129 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात धुळे जिल्ह्यात 330 कोटी 10 लाख इतकी थकबाकी असल्याने महावितरणने परीमंडळात वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या जवळपास चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू महिन्यात खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांनी बिल न भरल्यास त्यांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.
जळगाव परिमंडलात वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात कृषी वर्गवारी वगळता महावितरणची 1129 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात जळगाव जिल्ह्यात 568 कोटी 66 लाख, धुळे जिल्ह्यात 330 कोटी 10 लाख व नंदुरबार जिल्ह्यात 230 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
महावितरणने आता थकबाकीदारांची वीजजोडणी खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. या महिन्यात जळगाव जिल्ह्यातील 2110, धुळे जिल्ह्यातील 1084 व नंदुरबार जिल्ह्यातील 536 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईल अॅप्सवरील फोन पे, गुगल पे आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन व वेळेत पेमेंट करणाऱ्यांना महावितरणकडून भरघोस सूट दिली जाते.
थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी 310 रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी 520 रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
महावितरणतर्फे सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे नियमाने गरजेचे आहे. अन्यथा महावितरणचे कर्मचारी कधीही त्यांच्या घरी जाऊन वीजपुरवठा खंडित करू शकतात. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी थकित वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.