Dhule Crime News  
धुळे

Dhule Crime News | धुळे-मोहाडी पोलिसांची धडक कारवाई; चड्डी बनियान गँगचा मुख्य सूत्रधार जेरबंद

Dhule Crime News | पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला मध्यप्रदेशातून अटक करत चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

  • अवधान एमआयडीसी परिसरातील चोरी प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला

  • चड्डी बनियान गँगच्या मुख्य सूत्रधाराला मध्यप्रदेशातून अटक

  • सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले

  • आठ दिवस गुप्त पाळत ठेवून पोलिसांनी कारवाई केली

  • आरोपीने प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली

धुळे शहरातील अवधान एमआयडीसी परिसरात अनेक दिवसांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुख्यात चड्डी बनियान गँगविरोधात मोहाडी नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला मध्यप्रदेशातून अटक करत चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात अवधान एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीच्या गोदामातून सुमारे 1.25 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या घटनेनंतर मोहाडी नगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या चोरीमागे मध्यप्रदेशातील सराई टोळीचा हात असल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात धडक दिली. तब्बल आठ दिवस अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. स्थानिक पातळीवर माहिती गोळा करून टोळीच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला. योग्य संधी साधत पोलिसांनी गँगच्या मुख्य सूत्रधाराला शिताफीने अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने प्राथमिक चौकशीत चोरीची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. या टोळीने धुळे जिल्ह्यासह आसपासच्या भागात अनेक चोरीच्या घटना घडवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या धाडसी कारवाईमुळे परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोहाडी नगर पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT