Crime News  Pudhari
धुळे

Dhule Crime | गुंडाने छतावर चढून तलवार फिरवली; स्वतःवरही केले वार, जखमी अवस्थेत पोलिसांनी घेतले ताब्यात; घटनेचा व्हिडिओ समोर

मोहाडी परिसरात तब्बल तासभर थरार; अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे शहरातील मोहाडी परिसरात पोलीस आणि एका गुन्हेगारामध्ये तब्बल तासभर थरारनाट्य रंगले. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहताच राजवीरसिंग मिलनसिंग भादा हा हातात तलवार घेऊन घराबाहेर आला. त्यानंतर थेट घराच्या छतावर चढून त्याने तलवार फिरवत पोलिसांना आव्हान दिले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुका पोलिसांचे पथक मोहाडी परिसरात कारवाईसाठी गेले होते. यावेळी पोलिसांना पाहताच राजवीरसिंग भादा हातात तलवार घेऊन घराबाहेर आला. त्यानंतर तो घराच्या छतावर चढला आणि तलवार फिरवत पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.

तासभर पोलिसांना झुंजवत ठेवले

आरोपीच्या हातात तलवार असल्याने परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली होती. तब्बल तासभर हा थरार सुरू होता. आरोपीच्या आक्रमक पवित्र्यामुळे मोहाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. काही वेळातच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

दरम्यान, पोलिसांची मोठी कुमक पाहून आरोपीने स्वतःवरच तलवारीने वार केले. मात्र, जखमी अवस्थेतही त्याने तलवार फिरवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान अधिकच वाढले.

अखेर पोलिसांची शिताफी; आरोपी ताब्यात

अत्यंत सावधगिरीने परिस्थिती हाताळत धुळे तालुका पोलिसांनी अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या घटनेत राजवीरसिंग भादा जखमी झाला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT