Mumbai Agra Highway Bus Fire Incident
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने गावाजवळ मुंबई येथून इंदोरकडे जाणाऱ्या आराम बसला अचानक आग लागली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने या आराम बसमधील सर्व 36 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. या आगीत आराम बसचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
मुंबई कडून इंदोर कडे जाणारी डॉल्फिन ट्रॅव्हल्सची (एमपी ०९/बीजे ५५४४) ही देवभाने फाट्याजवळ पोहोचली. यावेळी अचानक गाडीमधून धूर निघत असल्याची बाब चालक जावेद खान यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तातडीने ही गाडी एका बाजूला थांबवून बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याचे आवाहन केले. तसेच झोपलेल्या प्रवाशांना देखील तातडीने उठवून बसच्या खाली आणले. मात्र काही क्षणात ही बस पूर्णपणे आगीने वेढली गेली.
या आगीची माहिती मिळाल्याने धुळे येथील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बसचे पूर्णपणे नुकसान झाले होते. बसला लागलेल्या या भीषण आगीमुळे महामार्गावरील एका बाजुची रहदारी देखील काही वेळ दुसऱ्या बाजुने वळवण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही रहदारी पुन्हा सुरळीत करण्यात आली.