Dhule Crime News | धुळे येथे एकास पाच वर्ष कारावासाची शिक्षा : तंबाखूची पुडी न दिल्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा झाला होता मृत्यू
धुळे : तंबाखुची पुडी न दिल्याचे किरकोळ कारणामुळे झालेल्या भांडणांत जीव गमावल्या प्रकरणी एकास पाच वर्ष कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती माधुरी आनंद यांनी सुनावली आहे. धुळ्यातील देवपूर परिसरातील विटापट्टीमध्ये राहणारे नरेश रमेश चव्हाण व हुकूम रमेश चव्हाण हे दिनांक ८ जुलै २०११ रोजी दही घेण्यासाठी जात होते. असतांना रस्त्यांत महानगर पालिकेजवळ हॉस्पीटल रोडवर नरेश यांच्या जवळ आरोपी सतीष भास्कर चौधरी याने येवून तंबाखूची पुडी मागीतली. यावेळी त्यांच्याकडे तंबाखूची पुडी नव्हती. असे सांगितल्याने त्याचा सतीश यांस राग आल्याने त्यांने नरेश मारहाण केली यामध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या संदर्भात मयताचा भाऊ हुकूम चव्हाण याने दिलेल्या तक्रारीनुसार भादंवि कलम ३०४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांचे तर्फे करण्यांत आला. उर्वरीत तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्याकडे सोपविण्यांत आला. पोलीस निरीक्षक येरूळे यांनी न्यायालयांत आरोप पत्र दाखल केले. आरोप निश्चीती नंतर या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या न्यायालयांत सुरू झाली. त्यांत सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजयकुमार सानप यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तथा फिर्यादी हुकूम चव्हाण, मयताचा भाऊ अनिल चव्हाण, पंच संजय मैनकर, जप्ती पंच शुभम, यांच्यासह शव विच्छेदन करणारे डॉ. अविनाश मोहने, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह एकूण ६ साक्षीदाराच्या महत्वपुर्ण साक्षी न्यायालयासमोर नोंदवण्यांत आल्या.
संपुर्ण पुराव्यांचा व युक्तीवादाचा विचार करुन आरोपी सतिष भास्कर चौधरी यांस भा.दं.वि कलम ३०४ (२) अन्वये पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व १००० रूपये दंड, भादवि कलम ३२३ व ५०४ अन्वये प्रत्येकी एक वर्ष शिक्षा व ५०० रूपये दंडाची सुनावली दंड न भरल्यांस अनुक्रमे १ महिने, १५ दिवस व १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यांत आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजयकुमार सानप यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले.

