Dhule Retired Employees Pension Delay Pudhari
धुळे

Dhule News | नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी अडचणीत

भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Dhule Retired Employees Pension Delay

धुळे: स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण, महापालिका व पाणी पुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांच्या समोर आर्थिक व मानसिक संकट उभे ठाकले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना दरमहा ३ ते ४ महिन्यांपर्यंत वेतन उशिराने मिळत असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

महागाई, मुलांचे शिक्षण, लग्न व घरगुती जबाबदाऱ्या यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. काही कुटुंबांमध्ये तर रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनला असून अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ योग्य ते आदेश देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित व वेळेवर निवृत्ती वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजी काकडे, उपाध्यक्ष सुनील देवरे, प्रकाश पाटील, राजेंद्र बागुल, तसेच सदस्य संतोष खंडेलवाल, शरद बिरारी, आनंदा चौधरी, सुनील पोतदार, आर. ए. पवार, शेखदादा, साळी, सुभाष सोनवणे, अशोक बारसे, सुधीर पोतदार, मुजगेनाना आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT