पिंपळनेर (जि. धुळे) : साक्री तालुक्यातील दारखेल परिसरात नरभक्षक बिबट्याच्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्रामस्थांनी पिंपळनेर वनपरिक्षेत्राच्या निष्क्रियतेविरोधात थेट धुळे वनसंरक्षक निन्नू सोमराज यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वेळेवर न पोहोचता गंभीर दुर्लक्ष केले. यामुळे दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घडलेल्या बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याची भीती दारखेल परिसरातही निर्माण झाली आहे.
शेतकरी नंदू तुकाराम भामरे यांच्या म्हशीच्या बछड्यासह गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केले. याबाबत तक्रार दाखल करुनही वन विभागाचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोहोचत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, नरभक्ष बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल. वन विभागाची निष्क्रियता, जनावरांचे वाढते नुकसान आणि बिबट्याचा धुमाकूळ या संकटामुळे दारखेल परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे.