Illegal Liquor Smuggling
धुळे : धुळे शहरालगतच्या लळींग घाटात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अपघातातील तिसऱ्या ट्रकमधून बेकायदेशीर दारूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर चार दिवसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक मालक, चालक, क्लीनर आणि मुद्देमालाच्या मूळ मालकाविरोधात कारवाई करण्यात आली असून तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लळींग घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या एमएच १२ एक्सएम १२७० क्रमांकाच्या ट्रकला धडक झाली होती. या अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मदतकार्य सुरू असताना एका आराम बसने अपघातग्रस्त वाहनांना धडक दिल्याने आणखी चार जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले होते.
या दुर्घटनेनंतर वाळू डंपर चालक आणि आराम बस चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अपघातात सहभागी असलेल्या तिसऱ्या ट्रकविरोधात तत्काळ कारवाई झाली नव्हती. दरम्यान, त्या ट्रकमधून अनधिकृत विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची बाब सुरुवातीपासूनच समोर आली होती. अखेर या प्रकरणात आज गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, ११८(४), ३३८, ३३६, ३३९ तसेच मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ट्रकमधून बनावट आणि हानिकारक विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारची आवश्यक परवानगी न घेता ही वाहतूक करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अपघातानंतर चालक आणि क्लीनर यांनी पोलिसांना माहिती न देता तसेच जखमी आणि मृतांना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.