student kidnapping attempt Dhule
धुळे : धुळे शहरातील जो.रा. सिटी हायस्कूल परिसरातून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
मध्यवर्ती भागातील जो.रा. सिटी हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणारा संग्राम विक्रम पात्रे हा विद्यार्थी सोमवारी वर्गात घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची अवस्था पाहून वर्गशिक्षकांना संशय आल्याने त्यांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर विद्यार्थ्याकडून त्याच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधण्यात आला. मात्र त्याला शाळेत घेण्यासाठी किंवा भेटण्यासाठी कोणीही आले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितल्याने शाळा प्रशासनाने त्यांना तत्काळ शाळेत बोलावले.
यावेळी संग्रामने दिलेल्या माहितीनुसार, तो शाळेत लघुशंकेसाठी गेला असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याला पकडून साक्री रोडमार्गे मोगलाई परिसराकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मोठ्याने आरडाओरडा केल्याने संबंधितांनी त्याला मोगलाई भागात सोडून पळ काढल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेचा उलगडा करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जो.रा. सिटी हायस्कूल ही शाळा शहर पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जवळच असून संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. शाळेच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा गर्दीतून अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्याला कसे नेले, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, साक्री रोड ते मोगलाई हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्याला नेताना त्याच्या आरडाओरड्याकडे कोणाचे लक्ष गेले का, याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. वर्दळीच्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेतले असून सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर संपूर्ण घटना स्पष्ट होण्याची शक्यता आहे.