धुळे : धुळे येथील गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी बाबा धीरजसिंहजी यांच्यावर गुरुद्वारातील एका सेवादाराने तलवारीने हल्ला चढवला. त्यामुळे गंभीर झालेल्या बाबाजींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीत आणखी एक जण जखमी झाला असून बाबाजींवर हा हल्ला करण्यात आला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याबाबत वेगवेगळ्या तर्कवितर्काची चर्चा देखील सुरू असून पोलिसांनी देखील त्याची दखल घेतली आहे.
धुळे येथे असलेल्या गुरुद्वाराच्या आवारात आज बाबा धीरजसिंहजी हे उन्हात वृत्तपत्र वाचत असताना हल्लेखोर युवक उमेश कैलास माळोदे याने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या डोके आणि मानेवर तलवारीने हल्ला केला. ही बाब लक्षात येताच बाबाजी यांचा नातेवाईक असणारा तसेच गुरुद्वाराच्या सेवाकार्यात काम करणारे रणवीरसिंह हे धावत आले.
मात्र त्यांच्यावर देखील उमेश नामक या हल्लेखोराने वार केला. ही बाब गुरुद्वाराच्या परिसरात असलेल्या अन्य सेवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेत हल्लेखोर उमेशला ताब्यात घेऊन बेदम मारहाण केले. दरम्यान ही माहिती कळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी सेवेकर्यांनी बाबाजी यांना गाडीत घालून खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तर पोलिसांनी हल्लेखोर युवकाला देखील रुग्णालयात हलवले.
सहानुभूतीनेच केला बाबाजींचा घात
गेल्या महिन्यातच हल्लेखोर युवक हा गुरुद्वाराच्या परिसरात फिरत असल्याची बाब बाबाजी धीरसिंहजी यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी त्याला बोलावून गुरुद्वाराच्या सेवेत सहभागी करून घेतले. मात्र त्यानेच आज बाबाजींचा घात केला आहे, अशी माहिती देखील आता पुढे येते आहे. दरम्यान गुरुद्वारा संदर्भात अंतर्गत काही वाद सुरू आहे. या वादातूनच या हल्लेखोर युवकाला कुणीतरी प्लांट केले असावे, यातूनच हा हल्ल्याचा प्रकार घडल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे या चर्चेच्या दिशेने देखील आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान हल्लेखोर उमेश हा नाशिक जिल्ह्यातील आडगाव परिसरात राहणारा आहे. त्यामुळे त्याच्या घराची झडती घेण्यासाठी धुळ्यातून पोलीस पथक रवाना झाले आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय ,या हे शोधण्याचे आव्हान आता धुळे जिल्हा पोलीस दलासमोर आहे.