

धुळे : पांझरा नदीकिनारी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पाच जणांना अटक केली आहे. मंदिरातील चांदीचे छत्र वितळवून त्याची लगड करणाऱ्या नंदुरबार येथील सराफालाही आरोपी करण्यात आले आहे.
चोरट्यांनी मंदिरातील कुलूप तोडून चांदीचे छत्र, सोन्याचा टिळा आणि दानपेटीतील रक्कम चोरली होती. घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, निरीक्षक श्रीराम पवार व निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली.
चोरट्यांनी साडीचा वापर करून चेहरा झाकला होता तसेच हातमोजे व सॉक्स घातले होते. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना वरखेडी रोडवरील सनी रमेश चव्हाण याच्यावर संशय आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरातून सोन्याचा टिळा आणि चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॉमी जप्त झाली.
सनी चव्हाणने सुनिल गायकवाड, सलमान पठाण आणि जाकीर शेख यांच्यासह चोरी केली असल्याचे सांगितले. दानपेटी उघडता न आल्याने ती मंदिराच्या मागील डबक्यात फेकल्याचेही त्याने उघड केले. पुढील तपासात पथकाने गायकवाड आणि पठाण यांना ताब्यात घेतले. दोघांनीही दानपेटी डबक्यातून काढून पडक्या घरात तोडल्याची कबुली दिली. तिथे लपवलेली उर्वरित रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.
चांदीच्या छत्राबाबत चौकशी केली असता सनीने ते जाकीर शेखकडे दिल्याचे सांगितले. जाकीरने ते नंदुरबारच्या गजानन सराफ याला विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी सराफाकडे जाऊन चौकशी केली असता त्याने छत्र वितळवल्याचे सांगितले. त्याच्याकडून सुमारे दीड किलो वजनाची चांदीची लगड जप्त करण्यात आली. आरोपींपैकी चार जणांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या मार्फत आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.