धुळे

धुळे : पिक विम्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याच्या पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या सूचना

गणेश सोनवणे

धुळे  : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात मागील 21 ते 23 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करुन पिक विम्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

पालकमंत्री महाजन म्हणाले की, धुळे जिल्ह्यात मागील 21 ते 23 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असून खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राज्य सरकारच्या सर्व समावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील 2 लाख 46 हजार 847 शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदि पिकांचा पिक विमा काढलेला आहे. पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थिती च्या निकषांनुसार २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून धुळे जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने (2.5 मी.मी पेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण बाबत 25 टक्के अग्रीम स्वरूपात नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाप्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीनी जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे कृषी विभाग, महसूल विभाग व संलग्न सर्व विभाग यांनी पाऊस लांबला असल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन शेती पिकांच्या नुकसानीबरोबर, जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी कार्यवाही करावी. तसेच सद्यस्थितीत धरणातील आरक्षित पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच अवैधरित्या पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी तहसिलदार, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, पाटबंधारे विभागातील अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मधील अधिकारी यांचे गस्तीपथक नेमून तालुकास्तरावर टंचाई निवारण समित्यांनी नियमित बैठका घेणेबाबत देखील निर्देश देण्यात यावेत. शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षणाबरोबरच संभाव्य टंचाई परिस्थिती संदर्भात शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य केले जाईल असेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले आहे.

अश्या आहेत उपाययोजना

धुळे जिल्ह्यात आजअखेर 268.5 मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या 61.5 टक्के इतका पाऊस झाला आहे. आज रोजी धुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 228.104 दलघमी (46.88 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 345.23 दलघमी (70.96 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आजअखेर 49 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून मौजे धावडे, ता. शिंदखेडा येथे 1 शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 शासकीय टँकर सुरु असून त्याव्यतिरिक्त 4 टँकर सुस्थितीत तयार आहेत. परंतु भविष्यात टँकर लागण्याची शक्यता लक्षात घेवून खाजगी टँकरसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे व ज्या ठिकाणी संभाव्य पाणीटंचाईची शक्यता आहे अशा गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव तातडीने पूर्ण करणेबाबत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून वैरण विकास योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे कार्यालयास रक्कम रु. 20 लाख उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात 1 हजार 306 हेक्टरवर अंदाजे उत्पादित होणारा चारा 53 हजार 407 मे. टन असून अर्थे, ता. शिरपूर येथे 500 मे.टन मुरघास तयार होत आहे. खरीप पेरणी क्षेत्रातून उत्पादित होणारा चारा 23 लाख 60 हजार 793 मे.टन आहे. जिल्ह्यात एकूण उत्पादित होणारा चारा 5.5 महिने पुरेल इतका असून जिल्ह्यातील चाऱ्यांची मासिक गरज 4.48 लक्ष मे.टन इतकी आहे.

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2023 च्या मार्गदर्शक सुचनांनुसार पावसाने खंड दिल्यामुळे उभ्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याने उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट होणार असल्याने नुकसान भरपाईच्या प्रमाणत विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते. त्याअनुषंगाने जेथे पर्जन्यमान कमी झाले आहे व पावसाचा खंड आहे अशा मंडळामध्ये कृषि विभाग व संबंधित कंपनीचे अधिकारी यांचेमार्फत पिकांचे सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात येत असून अहवाल प्राप्त होताच त्याअनुषंगाने अधिसुचना निर्गमित करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याचेही महाजन यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT