Land Fraud  file photo
धुळे

Dhule Land Fraud | बनावट कागदपत्रांनी शासकीय भूखंडाची विल्हेवाट; तत्कालीन ग्रामसेवकाला अटक

नेर येथील तत्कालीन ग्रामसेवकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

पुढारी वृत्तसेवा

Dhule Gram Sevak Arrested

धुळे : बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय मालकीचा भूखंड दुसऱ्याच्या नावे केल्याप्रकरणी नेर येथील तत्कालीन ग्रामसेवकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संजय दयाराम देवरे असे अटक करण्यात आलेल्या तत्कालीन ग्रामसेवकाचे नाव आहे.

धुळे तालुक्यातील मौजे नेर येथील शासकीय भूखंड क्रमांक ३३७/१/१ पैकी सरकारी खारीखाणची ६ हेक्टर ७४ आर जमीन असून, ही जमीन लघुसिंचन तलावासाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. या जमिनीपैकी १६० बाय १५०० फूट क्षेत्रफळाच्या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या शासकीय भूखंडाची हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याची बाब चौकशीत समोर आली. शासकीय मालकीच्या या भूखंडाचा ग्रामपंचायतीशी कोणताही संबंध नसतानाही तो गावठाण हद्दीत असल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सभेत तत्कालीन सरपंच शंकर हिरामण खलाणे यांनी बेकायदेशीरपणे ठराव मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये बनावट अभिलेख तयार करून, त्यात खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप आहे. तत्कालीन ग्रामसेवक संजय दयाराम देवरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी उमाकांत वसंत बोरसे, सुनील भास्करराव देसले, तत्कालीन सरपंच शंकर हिरामण खलाणे आणि ग्रामपंचायतीचे कारकून दत्तात्रय पांडुरंग सोनवणे यांनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे हा भूखंड राजेश चंद्रकांत सोनवणे (रा. नेर) यांच्या नावे केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर राजेश सोनवणे यांनी या शासकीय भूखंडावर ‘हॉटेल राजेश’ नावाने हॉटेल व बिअर बारचा व्यवसाय सुरू केल्याचे समोर आले. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा सखोल तपास करताना बनावट दस्तऐवज तयार करण्याच्या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक संजय दयाराम देवरे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT