Sakri Tehsil office self-immolation attempt Pudhari
धुळे

Dhule Farmers Protest | ऊस बिल थकल्याने शेतकऱ्यांचा साक्री तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

ऊस उत्पादकांनी धनंजय अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली आत्मदहन आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane bill pending Dhule

पिंपळनेर (साक्री) : ऊस बिल थकित राहिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साक्री तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले आहे. पिंपळनेर परिसरातील अनेक ऊस उत्पादकांनी धनंजय अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 14) साक्री तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

माहितीनुसार, गेल्या गळीत हंगामात साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी बबन गायकवाड यांच्याशी संबंधित एस. जे. शुगर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला होता. शासनाच्या नियमानुसार 14 दिवसांत ऊस बिल अदा करणे बंधनकारक असतानाही नोव्हेंबर 2025 पासून तब्बल पाच महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.

याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा कारखाना प्रशासन तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, निवेदने दिली; मात्र त्यांना कोणतीही दाद मिळाली नाही. परिणामी, कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, घरखर्च आणि विवाहासारख्या जबाबदाऱ्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीतून मार्ग न निघाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आंदोलन केले.

दरम्यान, संबंधित कारखान्याने 30 एप्रिलपर्यंत प्रती टन 2900 रुपये दराने थकीत ऊस बिल अदा न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा धनंजय अहिरराव यांनी दिला आहे.

या आंदोलनात लिंकेश अहिरराव, वैभव सोनवणे, राघो वंजी अहिरराव, सुभाष भीमराव अहिरराव, रमेश सखाराम काकुस्ते, आनंद उत्तमराव काकुस्ते यांच्यासह अनेक बाधित शेतकरी सहभागी झाले होते.

पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले; मात्र साक्री तहसीलदारांनी आंदोलन मालेगाव तहसील कार्यालयात करण्याचा दिलेला सल्ला आणि त्यांची भूमिका याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT