

धुळे : जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी धुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठया संख्येने सहभागी होवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जेल रोड येथे एकत्र येतात. कार्यक्रमांच्या वेळी या ठिकाणी मार्गावर वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून खबरदाराचे उपाय म्हणून या मार्गावरील वाहतुक मार्गात बदल करण्यात येत आहे, अशी अधिसूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निर्गमित केली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) द्वारे प्राप्त अधिकाराचा वापर 14 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 15 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कमलाबाई हायस्कुल चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, मामलेदार कचेरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, संतोषी माता मंदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा वरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येत आहे.
वरील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या पोलीस मुख्यालय गेट मार्गाने बस स्थानकात येतील व त्यांच मार्गाने बाहेर जातील. धुळे शहरात बसस्थानकाकडे शिरपूर येथुन येणारे व जाणारे एस.टी . बसेस या नरडाणा चौफुली देवपूर येथून बायपासने पारोळा चौफुली, गिदोडिया चौक, कबीर चौक, बारापत्थर मार्गाने बसस्टॅण्ड येथे व साक्री येथुन येणारे व जाणारे एस.टी. बसेस या बायपासने चितोड रोड मार्गे येथुन, लेनिन चौक, फाशी पुल मार्गे येतील व जातील.
वरील निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहने यांना लागू होणार नाही, वरील मार्गात व वेळेत परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार असतील. धुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.