Fraud Case Pudhari
धुळे

Dhule Fraud: शेअर मार्केटच्या नावाखाली धुळ्यातील अभियंत्याची ३.१४ कोटींची फसवणूक; ४ जणांना अटक

ऑनलाइन शेअर मार्केटिंगच्या बहाण्याने वेगवेगळ्या लिंक पाठवून धुळ्यातील अभियंत्याला एकुण 3 कोटी 14 लाख 99 हजार 891 रुपयाला चुना लावल्याची घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Dhule online share market fraud

धुळे: ऑनलाइन शेअर मार्केटिंगच्या बहाण्याने वेगवेगळ्या लिंक पाठवून धुळ्यातील अभियंत्याला एकुण 3 कोटी 14 लाख 99 हजार 891 रुपयाला चुना लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा आरोपी निष्पन्न झाले असून चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने हालचाली करून संबंधित खाते गोठवल्यामुळे एकुण 1 कोटी 19 लाख रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे.

धुळे येथील स्नेहनगरात राहणारे अभियंता हर्षद नारायण देशपांडे, यांना ऑनलाईन शेअर्स मार्केट लिंक द्वारे जास्त मोबदला मिळुन देण्याचे आमिष दाखवून त्यांचे व्हॉटसअॅपवर अज्ञातांनी वेगवेगळया मोबाईल नंबरवरुन लिंक पाठवली. त्यांना एका व्हॉटस्अॅप ग्रुप मध्ये जॉईन करुन, FYERS INDIA (HNI) अॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. सुरुवातीला काही शेअर्स घेण्यास सांगुन त्यांना जास्त परतावा मिळवून देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिकचा परतावा देण्याचे वारंवार आमिष दाखवले, संबंधित भामट्यांनी देशपांडे यांना वारंवार संपर्क करून त्यांना वेगवेगळया बँक खात्यात एकुण 3 कोटी 14 लाख 99 हजार 891 रूपये आरटीजीएस व अन्य ऑनलाईन पद्धतीने वर्ग करून परतावा दिला नाही. विशेष म्हणजे त्यानंतर देशपांडे यांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संबंधितांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने देशपांडे यांनी थेट सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिजित सोनवणे यांना तपासासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

या गुन्हयात तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करण्यात आला. तपासामध्ये नायगाव (वसई) येथे बनावट कॉल सेंटर तयार करुन तेथून बनावट सिमकार्डद्वारे शेअर मार्केटमध्ये अधिकचा परतावा मिळवून देण्याचे लोकांना आमिष दाखवून शेअर्स व नवीन आयपीओ खरेदीसाठी भाग पाडले गेल्याचे दिसून आले. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक करणाऱ्या टोळीतील सहा पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. फसवणुकीची रक्कम वेगवेगळया बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. सदर बँक खाते तात्काळ गोठवून फिर्यादी देशपांडे यांना एकुण 1 कोटी 19 लाख रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे.

साबिर मोहम्मद खान (रा.निल संकुल, बि.क्र.6, रूम क्र.4, सेक्टर 8, कळबोली, नवी मुंबई), सनत संजीव दास (रा.जी/601, ब्लु माउंट इडीफाईस, सनसिटी, वसई (पश्चिम)), राहुलकुमार शुक्ला ऊर्फ कैलाश राकेशकुमार (रा. ऐ-402, स्वागत हाईट्स, जीसीसी क्लब जवळ, मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे), आमिर करमशेर खान (रा. फ्लॅट क्र.4, ए, नूर ए हक अपार्टमेंट, रोड क्र. 17, आझादनगर, मानगो, जमशेदपुर, झारखण्ड), अभिषेक अनिल नारकर ऊर्फ गोपाल (रा. रूम नंबर 601, बी-विंग, पुनम दर्शन, पुनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबई (फरार)), मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की (रा. रूम नंबर 6, मोहम्मद हुसेन वाळ, मकरानी पाडा, सुभाष नगर, जोगेश्वरी पूर्व, मुंबई), रोशनकुमार सिथारामा शेट्टी (रा. साईराधा, गोकुलधाम, ए/101, बैलकेरे, उडपी 1, कर्नाटक (फरार)) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

धुळे जिल्हयातील सर्व नागरीकांना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अनोळखी ऑनलाईन लिंक पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना एसईबी रजिस्ट्रर ब्रोकर्सद्वारे डिमॅट अकाउंट द्वारेच गुंतवणूक करावी. बनावट अॅप, लिंक वर भरोसा करुन अल्पावधीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून कोणीही गुंतवणूक करु नये. तात्काळ सायबर हेल्प लाईन नंबर 1930 या टोल फ्री नंबरवर कॉल करा, अथवा सायबर पोलीस ठाणे, धुळे येथे संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT