डोळ्यांत चिली स्प्रे मारून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा सोनगीर पोलिसांनी पर्दाफाश केला Pudhari
धुळे

Dhule Crime | ड्रायफ्रूट व्यापाऱ्यावर चिली स्प्रे करून लूट; दोघांना अटक

ड्रायफ्रूट व्यापाऱ्याच्या डोळ्यांत चिली स्प्रे मारून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा सोनगीर पोलिसांनी पर्दाफाश केला

पुढारी वृत्तसेवा

Dry Fruit Merchant Chilli Spray Robbery

धुळे : धुळे तालुक्यातील रामी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रायफ्रूट व्यापाऱ्याच्या डोळ्यांत चिली स्प्रे मारून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा सोनगीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापडणे येथील रहिवासी वासुदेव दयाराम माळी हे त्यांच्या ओमनी व्हॅनमधून (एमएच-18/आर-0175) ड्रायफ्रूटचा माल घेऊन रामी गावाकडे जात होते. रामी गावाजवळील निर्जन परिसरात दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांची व्हॅन अडवली.

आरोपींनी माळी यांच्या डोळ्यांत चिली स्प्रे मारला. त्यानंतर बचावासाठी पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून दुखापत करण्यात आली. तसेच व्हॅनमधील एक लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४) व ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना महत्त्वाची माहिती मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी राहुल पुंडलीक पाटील (रा. बोरीस, ता. जि. धुळे), विठ्ठल वामन भोळे (रा. आकुर्डी, पुणे), साई ऊर्फ भटू रविंद्र माळी (रा. जुने धुळे), मनोज पाटील, निलेश सुनिल पाटील (रा. कापडणे, ता. जि. धुळे) आणि जॅकी साधुसिंग तनवाणी (रा. कुमारनगर, धुळे) अशा सहा आरोपींची नावे निष्पन्न केली.

यापैकी राहुल पुंडलीक पाटील आणि निलेश सुनिल पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT