Cold Wave File Photo
धुळे

Dhule Cold Wave | धुळे जिल्ह्यात 6.3 नीचांकी तापमानाची नोंद; नागरिकांना भरली हुडहुडी

किमान तापमानाचा पारा ६.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने पहाटेपासूनच वातावरणात गारठा

पुढारी वृत्तसेवा

Dhule Weather Update

धुळे : धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या निशांगी तापमानाची नोंद करण्यात आली आहे . गेल्या काही दिवसांपासून धुळ्याचे तापमान दहा अंशापर्यंत आले होते. मात्र, शुक्रवारी (दि.२०) अचानक तापमान 6.3 अंशावर आल्याने धुळेकरांना हुडहुडी भरली आहे. गुलाबी थंडीमध्ये पांझरा नदीकाठचा परिसर मॉर्निंग वॉक करणारे तसेच व्यायाम करणाऱ्यांनी फुलला आहे

धुळेकरांना यंदाच्या हिवाळ्यात आज प्रथमच कडाक्याच्या थंडीचा अनुभव आला. शहरातील किमान तापमानाचा पारा ६.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने पहाटेपासूनच वातावरणात गारठा जाणवत होता. यापूर्वीही तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, आज झालेली तापमानातील घसरण अधिक लक्षणीय ठरली. २०२६ मधील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने धुळ्यात हिवाळ्याचा कडाका प्रत्यक्ष जाणवू लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत असला तरी आजच्या तापमान घसरणीने थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. विशेषतः रात्री उशिरा तसेच पहाटेच्या वेळी वातावरणात मोठ्या प्रमाणावर गारवा होता. सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. नोव्हेंबर महिन्यातच तापमानाचा पारा इतका खाली आला आहे.

ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पहाटेच्या वेळी शेतातील पिकांवर दवबिंदू साचलेले दिसत आहेत. गवताच्या पात्यांवर जमा झालेले दवबिंदू सूर्यकिरणांमध्ये चमकत असल्याने शेतशिवाराला वेगळेच निसर्गसौंदर्य प्राप्त होत आहे. काही भागांत सकाळच्या वेळी धुक्याचे वातावरणही पाहायला मिळत आहे.

तापमानाचा पारा घसरला असला तरी शहरातील जनजीवनावर अद्याप विशेष परिणाम झालेला नाही. उबदार कपड्यांच्या खरेदीला अजून वेग आलेला नाही. शहरात शेकोट्या पेटविण्याचे चित्रही तुरळक आहे. मात्र, पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना गारव्याची जाणीव होत आहे.

धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू असताना तापमानातील घसरण शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. गहू, हरभरा यांसारख्या पिकांच्या वाढीसाठी थंड हवामान अनुकूल मानले जाते. मात्र, तापमानातील अचानक बदल तसेच दवाचे प्रमाण, याकडे शेतकऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

नोव्हेंबरच्या उत्तरार्धातच तापमानाचा पारा ६.३ अंशांपर्यंत घसरल्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रतेबाबत धुळेकरांचे लक्ष लागले आहे. धुळेकरांनी यापुर्वीच्या हिवाळ्यांमध्ये ३ अंशांपेक्षा कमी तापमानाचा अनुभव घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT