Dhule News : कृषी उत्पन्न बाजार समितीने गोवंश तस्करी, तसेच गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी!

अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा बाजार समिती प्रशासनाला इशारा
Dhule News : कृषी उत्पन्न बाजार समितीने गोवंश तस्करी, तसेच गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी!
Dhule News : कृषी उत्पन्न बाजार समितीने गोवंश तस्करी, तसेच गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी!
Published on: 
Updated on: 

धुळे : धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार अनुप अग्रवाल तसेच गोरक्षकांनी यापूर्वी दोन वेळेस गुरांच्या बाजारावर कारवाई केली. मात्र या दोन्ही प्रकरणात बाजार समितीच्या प्रशासनाने संबंधित गो तस्करांवर कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी आज बाजार समितीमध्ये आंदोलन केले. येत्या आठ दिवसात या संदर्भात सुचवलेल्या शिफारसींवर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी सभापती योगेश पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत बाजार समिती अमुलाग्र बदल घडून आणू , तसेच अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर आम्ही काम सुरू केले असून लवकरच बाजार समिती प्रशासनात आमुलाग्र बदल घडून येतील असे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, धीरज पाटील प्रशांत भदाने , भरत मोरे , मनोज बंब,हेमराज पाटील, बाबाजी पाटील, आंनंद जावडेकर, महिला आघाडीच्या संगीता जोशी अरुणा मोरे ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, गोकुळ बडगुजर, नितीन पाटील, प्रकाश वाघ, शिवाजी शिरसाळे,मनोज जाधव, कुणाल कानकाटे, योगेश पाटील पंकज भारस्कर, सागर साळवे, दिनेश पाटील, निलेश कांजरेकर, सुनील चौधरी, गुलाब धोबी, संजय पाटील, संजय नत्थु पाटील ,कपिल लिंगायत डॉ. सुनील पाटील , बाळू शेंडगे डॉ सोमनाथ चौधरी , अमोल मोरे, आदी उपस्थित होते.

बाजार समितीतील कथित गोवंश तस्करीचा प्रकार दि. २० मे २०२५ रोजी उघडकीस आला. त्यावेळी विद्यमान आमदार अनुप अग्रवाल स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. तसेच दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुन्हा ८० ते १०० गोवंशीय जनावरांच्या जप्तीच्या कारवाईच्या वेळी आमदारांचे समर्थक व गौरक्षक उपस्थित होते. या दोन्ही गंभीर घटनांनंतरही बाजार समितीच्या प्रशासकीय व संचालक मंडळाने स्वतःहून ठोस प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही?, गैरप्रकार उघड करण्यासाठी बाहेरील व्यक्तींना पुढाकार का घ्यावा लागतो?, कथित तस्करीच्या सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयत्न कोणाच्या दबावाखाली सुरू आहे का?, असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावेळी उपस्थित केला आहे.

धुळे जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री आणि बहुतांश लोकप्रतिनिधी भाजपाचे असताना, तसेच भाजपाच्या माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे कामकाज चालत असल्याचे असताना, या प्रकारांवर कारवाई न होणे ही गंभीर बाब आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, योग्य भाव व पारदर्शक व्यवहार उपलब्ध करून देणारी महत्त्वाची व्यवस्था असून हजारो कुटुंबांच्या रोजगाराचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, बाजार समितीतील कथित बेकायदेशीर व्यवहार, गोवंश तस्करी, बोगस पावत्या, चोरीचे पशुधन, सुरक्षेचा अभाव, प्रशासकीय दुर्लक्ष आणि बाजारपेठेची घटती आर्थिक उलाढाल यामुळे संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर गंभीर बाबींवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.कथित गोवंश तस्करी, बोगस पावत्या व चोरीच्या पशुधनाची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम

हे निवेदन प्राप्त झाल्यापासून आठ दिवसांच्या आत लेखी खुलासा, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या शिफारशी आणि कालबद्ध कार्यवाही आराखडा सादर करावा. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, पशुपालक व कष्टकरी घटकांना सोबत घेऊन बाजार समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व ‘टाळे ठोको आंदोलन’ छेडेल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन व बाजार समितीवर राहील. असा इशारा यावेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.