Dhule Devpur murder case
धुळे : धुळे शहरातील देवपूर परिसरातील गोंदूर रोडवर सात वर्षांपूर्वी घडलेल्या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह १२ जणांना दोषी ठरवले असून एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. दोषी ठरलेल्या आरोपींना होणाऱ्या शिक्षेबाबतची सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे.
८ जून २०१८ रोजी पूर्व वैमनस्यातून रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह भूपेश वाल्मिक पाटील, हर्षद उर्फ दादू रविंद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, संदीप उर्फ विक्की दिलीप वेळीस, अप्पा उर्फ अर्जुन भगवान अहिरे, गौरव बाजीराव पवार, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे यांच्याविरोधात खून, पुरावे नष्ट करणे तसेच आरोपींना मदत केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश जे. एस. पुलाटे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांनी पुरावे मांडले, तर फिर्यादी प्रशांत पाटील यांच्या वतीने अॅड. निलेश दुसाने यांनी सहकार्य केले.
मंगळवारी न्यायालयात सर्व आरोपींना हजर करण्यात आले. मात्र माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांना कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने वैभव उर्फ सोनू अरुण पवार याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले, तर उर्वरित १२ आरोपींना दोषी ठरवले.
दरम्यान, दोषी ठरवलेल्या आरोपींना देण्यात येणाऱ्या शिक्षेबाबत ११ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्या वेळी आरोपींची बाजू तसेच सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालय शिक्षेबाबत निर्णय देणार आहे. आज निकाल लागणार असल्याने न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.