धुळे : मध्य प्रदेशातील इंदोर येथून मालेगाव कडे वोल्वो बस मधून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने हाणून पाडला आहे या कारवाई मध्ये दीड कोटी रुपयांची बस तसेच 8 लाख 18 हजार 85 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत पान मसालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात बसच्या मालक तसेच चालक,कंडक्टरसह संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदौर येथून श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी क्रमांक-एमपी-41- झेडजे 7444 हिचेत पुणे कडे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसालाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली. त्यावरुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षांत घेवून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उप-विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना घटनेची माहिती देवुन मुंबई आग्रा महामार्गावर छाप्याचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार मुंबई आग्रा महामार्ग वर आर्वी पोलीस दुरक्षेत्र समोरच नाकाबंदी करुन सापळा लावला.यावेळी श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी इंदौर कडून मालेगांव कडे येतांना दिसली. तसेच मिळालेल्या बातमीतील वाहनाची देखील खात्री झाल्याने लक्झरीला थांबण्याचा इशारा करुन थांबविली. लक्झरीच्या डिक्कीची तपासणी व झडती घेतली असता त्यात वाहनांतील प्रवाशांच्या बॅगच्या शेजारीच पांढ-या गोण्या दिसून आल्या. गोण्या उघडून तपासणी केली असता त्यात राजश्री पान मसाला, रजनीगंधा पानमसाला व सोबत सुगंधीत तंबाकूचा साठा असा एकुण एकुण 8 लाख 18 हजार 85 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत पान मसालाचा साठा मिळून आला.
या प्रकरणी श्यामोली परिवहन कंपनीचा मॅनेजर अरुप सरकार (रा.इंदौर), शर्मा ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक कमल शर्मा (रा. इंदौर), पुणे येथील प्रविण नावाचा व्यक्ती, वोल्वो लक्झरीचा ड्रायव्हर सचिन दिनेश बाडोले (रा.आवास नगर, देवास), व बिरजूदास रतनदास बैरागी (रा.इंदौर ), बसचा कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सुर्यवंशी (रा.इंदौर) यांचे विरुध्द पोलीस हवलदार चेतन कंखरे यांचे तक्रारीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. तसेच ड्रायव्हर सचिन दिनेश, बिरजूदास रतनदास बैरागी, बसचा कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली.
गुटखा तस्करांनी आता नव्याने पॉश वोल्वो ट्रॅव्हल्सचा आडमार्गाने गुटखा तस्करी करत असल्याचे अधोरेखीत झाले असुन अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणांत 8 लाख 18 हजार 85 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत पान मसाला व 1,कोटी 50 लाख रुपयाची वोल्वो लक्झरी बस जप्त करण्यात आली आहे.