

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगाव कडून धुळे शहराकडे येणारा दारूचा अवैध साठा मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक कोटी 16 लाखाचा ऐवज जप्त केला असून एका जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता दारूचा मुख्य तस्कराला अटक करण्याच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरून दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर धुळे शहरा लगतच्या लळींग येथील टोल नाक्याजवळ सापळा लावला. लळींग टोल नाक्याचे पुढे धुळेकडे येणारे रोडवर जय मल्हार चहाच्या टपरीच्या समोर रोडावर ट्रक क्रमांक एम एच २३ ए यू ७०४२ हा संशयितरित्या उभा दिसला. त्यामुळे पोलीस पथकाने चालकाची चौकशी करण्यास सुरुवात केली.
चालक यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव मुकेश नाथु प्रजापती (रा. धानी कचावदा, तालुका धरमपुरी, मध्यप्रदेश) असे सांगुन गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तर देवू लागला. त्यामुळे संशयित ट्रक पोलीस स्टेशन आवारात आणून उभे करुन झडती घेतली असता त्यात दारूचा साठा आढळून आला.ट्रक मधून सुमारे 92 लाख 16 हजार रुपये किमतीचा दारूचे 1500 बॉक्स आढळून आले. या दारूच्या साठ्या विषयी चालकाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे ही दारूची तस्करी असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्रक सह सुमारे एक कोटी दोन लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.