bogus doctors pudhari photo
धुळे

Dhule crime: विना परवाना एलिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

पोलिस पथकाने सर्व वैद्यकीय साहित्य व औषधांचा पंचनामा करून साठा जप्त केला आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठीची वैद्यकीय परिषदेची अधिकृत नोंदणी किंवा परवाना नसताना ऍलोपॅथिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील एका बोगस डॉक्टरवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या बोगस डॉक्टरच्या विरोधात आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील लामकानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम इंद्रसींग चव्हाण यांना ऑनलाइन पोर्टल आणि निनावी अर्जाद्वारे मेहेरगाव येथे बोगस डॉक्टर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिष पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम चव्हाण, आरोग्य सेवक पंकज सांगळे आणि औषध निर्माण अधिकारी राकेश चोरडीया या पथकाने मेहेरगाव येथील वाणी गल्लीतील एका खोलीवर अचानक छापा टाकला.

पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता गौरव सोनीस याच्याकडे स्टेथोस्कोप, बी.पी. मशीनसह विविध प्रकारची एलोपॅथीची अँटीबायोटिक्स औषधे, सिरप, इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या तसेच इलेक्ट्रोपॅथी व होमिओपॅथीची औषधे आढळून आली. पथकाने या बोगस डॉक्टर कडे अधिकृत परवानची विचारणा केली असता त्याने इलेक्ट्रोपॅथीचे प्रमाणपत्र दाखवले. मात्र, अॅलोपॅथी उपचारांसाठी हे प्रमाणपत्र अमान्य असल्याने आणि वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही वैध परवाना नसल्याने तो बोगस डॉक्टर म्हणून सराव करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने सर्व वैद्यकीय साहित्य व औषधांचा पंचनामा करून साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी लामकाणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गौरव सुरेश सोनीस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT